२२ सप्टेंबर
डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील जयंती
महाराष्ट्राचे थोर शिक्षणतज्ज्ञ, गरीब-अस्पृश्यांचे कैवारी, संत्यासाठी व समाज सुधारणेसाठी ज्यांनी आपले तन मन धन वेचले असे पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील हे महाराष्ट्र देवतेच्या गळ्यातील जणू सुंदर टप्पोऱ्या पुष्पहाराप्रमाणे शोभून दिसतात.
यांचे मूळ गाव ऐतवडे (बु.) जिल्हा सांगली हे होय. त्यांचा जन्म २२ सप्टेंबर १८८७ साली त्यांच्या आजोळी कुंभोज, जिल्हा कोल्हापूर येथे झाला. वडील पायगोंडा पाटील यांच्या फिरत्या तलाठी व्यवसायामुळे समाजातील विषारी विषमता व अज्ञानाचा ठसा बालपर्णीच भाऊरावांच्या मनावर उमटला.
प्राथमिक शिक्षणानंतर छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना आश्रय दिला. पण सामाजिक विचारांचे थैमान मनात असल्याने भाऊराव सहावीत नापास झाले. त्यांना पास करण्यासाठी कोणीतरी शाहू महाराजांची चिठी अत्यंत निर्भीड असलेल्या भार्गव गुरुजींना दिली तेव्हा ते म्हणाले, "एक वेळ मी याच्या बाकाला पास करीन पण याला नाही!" अशा अनुत्तीर्ण अण्णांना मात्र पुणे विद्यापीठाने पुढे डी. लिट., केंद्र सरकारने पद्मभूषण तर जनतेने 'कर्मवीर अण्णा' ही पदवी प्रेमाने दिली.
समाजाला अज्ञानाच्या गर्तेतून वर काढण्यासाठी शेतकरी, कामकरी, अस्पृश्य, ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाची संधी मिळाली पाहिजे असे वाटून अण्णांनी काले, ता. कराड, जि. सातारा येथे १९८९ साली 'रयत शिक्षण संस्थे' ची स्थापना केली. आण्णा खेडोपाडी हिंडून हुशार मुले पारखून घेऊन येत. गरीब, अस्पृश्य मुलांच्या शिक्षणाच्या सोयीसाठी त्यांनी 'दुधोंडी' येथे विद्यार्थी आश्रम सुरू केला. तसेच नेर्ले येथे विद्यार्थी वसतिगृह सुरू केले. मुलांच्या चरितार्थासाठी 'मुष्ठीयज्ञ' म्हणजे मूठ मूठ धान्य गोळा केले. सांगली जिल्ह्यातील दूधगाव येथे विद्याप्रसारक मंडळाची स्थापना केली.
वसतिगृहांची संख्या वाढल्यामुळे त्यांना पुढे मुलांची उपजीविका, शिक्षण खर्चाची अडचण भासू लागली. तेव्हा सातारचे राजे भोसले व आण्णांच्या पत्नी सौ. लक्ष्मीबाई यांचे मोलाचे सहकार्य त्यांना मिळाले. मुलांची आजारपणे व दुखणी यावेळी लक्ष्मीबाई मायेने सेवा करीतच पण वसतिगृहाच्या चरितार्थासाठी दागिनेही त्यांनी विकले.
प्राथमिक शिक्षणाबरोबर डी.एड, बी.एड. कॉलेज, महाविद्यालय ग्रामीण भागात काढून शिक्षण विस्ताराचे स्वप्न अण्णांनी पुरे केले. पण त्याचबरोबर स्वावलंबी शिक्षणावर त्यांनी भर दिला. नांगरणे, पेरणे, कुळवणे, खुरपणे इ. कामांबरोबरच भाकरी-भाजी, भांडी धुणी, शुश्रूषा करणे इ. सर्व कामे मुले स्वतः करू लागली होती. 'कमवा व शिका' या योजनेद्वारे संस्थेच्या शेतीत व इमारती बांधकामात कामे करून अण्णांच्या विद्यार्थ्यांनी, कणखर मनाने व शक्तिमान मनगटाने परदेशी शिक्षण घेतले. ५७८ प्राथमिक शाळा, ३३४ माध्यमिक शाळा, ३४ महाविद्यालये, विधीमहाविद्यालय व ७९ वसतिगृहे अशा त्यांच्या अनेक संस्था महाराष्ट्रात पसरल्या आहेत.
शिक्षण व जीवनाचा घनिष्ठ संबंध आहे. त्यासाठी मन-मस्तक मेंदू यांचा सुरेख संगम शिक्षणातून साधला पाहिजे हे त्यांचे तत्त्वज्ञान होते. आजच्या शिक्षणात मरगळ, ऐदीपणा, ध्येयशून्यता वाढली आहे. सुशिक्षित युवक कष्ट, श्रम, ज्ञानलालसा, बलोपासना, सत्यापासून दूर चालला आहे. 'कमवा व शिका', 'स्वावलंबन' हा महामंत्र विद्यार्थ्यांना
देणारे अण्णा ९ मे १९५९ रोजी निवर्तले.
Comments
Post a Comment