सर विश्वेश्वरय्या जन्मदिन

 १५ सप्टेंबर



सर विश्वेश्वरय्या जन्मदिन


प्रखर बुद्धिमत्ता, अदम्य उत्साह, लोकोत्तर तत्वनिष्ठा, अखंड वाचन, चिंतन, संशोधन आणि कामाचे डोंगर धडाडीने पार करणारे सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्म म्हैसूर राज्यातील मदनहळ्ळी नावाच्या खेक्ष्धात दि. १५ सप्टेंबर १८६१ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण चिकयलापूर येथे पार पडले, ते लहान असतानाच त्यांचे वडील निवर्तल्यामुळे पुढील शिक्षण बंगलोरला सेंट्रल कॉलेजमध्ये अथक परिश्रमाने पूर्ण केले. आळस, कंटाळा, धकवा, दुर्लक्षितपणा, आजार, रजा घेणे हा प्रकार त्यांना माहीतच नव्हते,


१८८० मध्ये विश्वेश्वरय्या पदवी परीक्षा पास होऊन त्यांनी पुणे येथे इंजिनियरींगची डिग्री स्थापत्यशास्त्रामध्ये मिळवली. त्यामुळे अभियंता म्हणून सरकारने त्यांची नेमणूक केली आणि त्यांनी आपले ज्ञानसामर्थ्य व व्यवसायिक सामर्थ्य पणाला लावून कामे करायला सुरवात केली. खानदेशातील एका नाल्यावर त्यांनी 'पाइप व सायफन' यशस्वीरीत्या बसविले. १८९३ साली सिंध प्रांतातील सकर येथील गावाला शुद्धपाण्याची निर्मिती करण्यासाठीच्या प्रयानासाठी विश्वेश्वरय्यांनी रसायनशास्त्राचे, भूगर्भशास्त्राचेही ग्रंथ अभ्यासले. रात्रंदिवसाच्या परिश्रमाने व विज्ञाननिष्ठेने सिंध सरकारला आर्थिकदृष्ट्या न परवडणारे सफर योजनेचे कार्य त्यांनी धडाडीने पार पाडले.


१९०४ मध्ये पिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी 'ब्लॉक सिस्टीम' शोधून काढून शेतीला उपकारक अशी पाण्याची काटकसर यंत्रणा त्यांनी अमलात आणली, पुण्याच्या खडकवासला धरणाच्या भिंतीला धोका पोहोचू न देता पाण्याचा साठा आणि पातळी वाढविण्यासाठी आपोआप उघडणाऱ्या कळसूत्री दरवाजांची कल्पना शोधली ती विश्वेश्वरय्यांनी. काही काळानंतर पनामा कालव्यातही अशाच दरवाजांचा वापर करण्यात आला. एकदा एडनमधील सैनिकांवर गोड्या पाण्याऐवजी समुद्राचे खारे पाणी पिण्याची वेळ आली होती, त्यासाठी त्या सरकारने हुशार, कल्पक, कर्तबगार अभियंत्याची मागणी भारत सरकारकडे केली. तेव्हा चिन्वेश्वरय्यांनीच तो पाण्याचा प्रश्न सोडवला. तेव्हा इंग्रज सरकारने त्यांना अनेक किताब बहाल केले. 'सर', 'कैसर-इ-हिंद', 'के.सी. आय. ई' पुरस्कारांनी ते सन्मानित झाले.


हैदराबादमधील बेफाम वाहणाऱ्या विनाशकारी मुसी नदीला अविरत प्रयत्नांनी लगाम घालण्याचे विधायक कार्य विश्वेश्वरय्यांनी केले. कोल्हापूरच्या रंकाळा तलावाचे शहरात घुसणारे पाणी थोपविण्याची किमया त्यांनीच केली. सेवानिवृत्तीनंतरही ते ४४ वर्षे सतत कार्यरत राहिले. १९०९ मध्ये म्हैसूर राज्याचे अभियंतापद लाभल्यानंतर गरिबांच्या हिताच्यादृष्टीने पाणीपुरवठा, दळणवळण, पाटबंधारे या विभागात खूप सुधारणा घडवून आणल्या. रेशीमनिर्मिती, मौसूरच्या चंदन सत्त्वापासून तेल व साबण निर्मिती; आगपेट्या कागद उदबत्या कागदनिर्मिती, म्हैसूर विद्यापीठ स्थापना, युवकांसाठी तांत्रिक शिक्षण संस्था, शेतीसुधारणा योजना अशा अनेक कारणास्तव जीवन वाहणान्या विश्वेश्वरय्यांना 'भारतरत्न' पुरस्काराने गौरविले गेले. अविवाहित राहून संपन्न आयुष्याची शताब्दी साजरी करताना युवापिढीला त्यांनी 'झिजलात तरी चालेल पण गंजून जाऊ नका' असा तेजस्वी संदेश दिला. दि. १४ एप्रिल १९६२ मध्ये या दीर्घायुषी ज्ञानमहर्षनि या विश्वाचा निरोप घेतला. म्हैसूर जवळच्या कृष्णराजसागर धरणाच्या बाजूच्या कालव्याला 'विश्वेश्वरय्या कालवा' असे नाव देण्यात आले आहे.


Comments