डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम जन्मदिन

 १५ ऑक्टोबर

डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम जन्मदिन



आपल्या अथक संशोधनाने अंतराळ विज्ञानातले मोठमोठे प्रयोग यशस्वी करत भारत देशाच्या थेट  राष्ट्रपती पदावर विराजमान होणारे 'अब्दुल पाकीर जैनुलाबदिन अब्दुल कलाम' यांचा जन्म मद्रासमधील रामेश्वरम् या बेटासारख्या गावात १५ ऑक्टोबर १९३१ साली झाला. तीर्थक्षेत्र रामेश्वरम्मधील घंटानाद व नजीकच्या मशिदीतील अजान यांनी अब्दुलला 'सर्वांठायी एकच परमेश्वर आहे' ही सर्वधर्मसमानता व सहिष्णुता शिकविली. उपजतच प्रखर बुद्धिमत्ता, प्रामाणिकपणा व सरळमार्गीपणा यांची देणगी त्याला लाभली होती.


कॉलेजजीवनात टॉलस्टॉय, हार्डी, स्कॉट, मिल्टन यांसारख्या थोर साहित्यिकांच्या विचारसरणीचा अब्दुलवर खूप प्रभाव पडला होता. शिवाय अंतराळातील ग्रहगोल, पक्षी, तारे विमाने याबद्दल त्याला खूप कुतूहल वाटे. विज्ञान आभियांत्रिकीमध्ये बी. एस्सी. पदवी मिळवल्यानंतर उच्चशिक्षणासाठी 'मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी' मध्ये घेऊन अब्दुल कलाम यांनी 'एअरोडायनामिक्स' शाखेत उज्वल यश संपादन केले. अत्यत कठीण परीक्षा देत देत पुढे ते 'रॉकेटरी' क्षेत्रातले तज्ज्ञ बनले. वयाच्या ४८ व्या वर्षी त्यांनी एसएलव्ही-३ हे रॉकेट अंतराळात  सोडले. पण दुर्दैवाने या यानाचे अंतराळात तुकडे झाले.


या अपयशाने खचून न जाता मात्र ते नव्या उमेदीने कामाला लागले. यावेळी त्यांना  प्रो. विक्रम साराभाई, डॉ. ब्रह्मप्रकाश, श्री. नारायण, प्रा. सतीश धवन, डॉ. वसंत गोवारीकर यासारखे संपन्न गुरू आणि सहकारी लाभले. त्यानंतर अब्दुलना अमेरिकेतील 'नासा' मध्ये अभ्यासाची संधी मिळाली. भारतातील 'इस्रो' या महत्त्वाच्या वैज्ञानिक संस्थेचे प्रमुखपद त्यांना लाभले. पहिल्या अयशस्वी यानातील चुका शोधीत पुनर्बाधणी करून कलाम यांनी अपार कष्टाने एसएलव्ही ३ डी १ हे यान यशस्वीपणे अंतराळात सोडले. या प्रचंड यशानंतर डॉ. कलाम यांना १९८१ साली'पभूषण' पदवीने सन्मानित करण्यात आले.

त्यानंतर 'डिफेन्स रिसर्च अँड डेव्हपमेंट लॅबोरेटरी' या देशातील मोठ्या प्रयोगशाळेची उभारणी डॉ. कलाम व सहकारी शास्त्रज्ञांनी खडतर प्रयत्नांनी केली व १६ सप्टेंबर १९८५ रोजी श्रीहरिकोटा येथून 'त्रिशूल' व पाठोपाठ "अग्नी', 'पृथ्वी', 'नाग' क्षेपणास्त्रे अवकाशात उडवण्यात मोठे यश मिळवले. परदेशी शास्त्रज्ञांना हेवा वाटावा असे आणि शत्रूला धडकी भरेल एवढे सामर्थ्य त्यात होते. १९९८ मधील 'पोखरण' अणुस्फोटातही त्यांचा सहभाग होता. दूरदृष्टी, परिश्रम, जिद्द, देशहिताची तळमळ व विज्ञानाची आराधना त्यामुळे डॉ. कलाम यांना प‌द्मविभूषण व भारतरत्न  असे सर्वोच्च सन्मान लाभले. नंतरचे खरे निवृत्तीचे वय पण शासनाने ते नाकारून जुलै २००२ मध्ये राष्ट्रपतिपदी त्यांची नियुक्ती केली. अशाप्रकारे एका नावाड्याचा मुलगा अंतराळाचा नावाडी बनतो व राष्ट्रपतीही बनतो हा चमत्कारच नाही  काय ? त्याचे 'अग्निपंख' हे आत्मचरित्र अत्यंत वाचनीय आहे.

Comments